ठाणे -: शहरातील एका अंध वृद्ध दांपत्याचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आल्यानंतर खाजगी हॉस्पिटलने रुग्णांस दाखल करण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेच्या ठाणे ग्लोबल हॉस्पिटलच्या प्रशासनाच्यावतीने तात्काळ सदर अंध व्यक्तींना बेड उपलब्ध करून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले.
सध्या कोरोनाच्या संसर्ग वाढला असून तात्काळ उपचार मिळणे अत्यावश्यक आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. ठाण्यातील सुहास मराठे आणि त्यांच्या पत्नी सुचेता मराठे यांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आल्यानंतर त्यानी शहरातील खाजगी रुग्णालयात धाव घेतली परंतू रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटल मध्ये संपर्क साधला असता तेथील प्रशासनाने त्या अंध पती पत्नीना तात्काळ बेड उपलब्ध करून देवून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. सदर दांपत्याची हॉस्पिटलमध्ये योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.
कोरोना संदर्भात नागरिकांनी गैरसोय होवू नये, उपलब्ध हॉस्पिटलची माहिती जलदरित्या उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्यावतीने अद्ययावत वॉर रूमच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी महापालिका प्रशासन शहरातील नागरिकांना सर्वोतोपरी आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे असं ठाणे मनपा ने आपल्या प्रसिद्धी पत्रात म्हटलं असून अंध वृद्ध दाम्पत्य यांनी बेड उपलब्ध होण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मॅसेज पाठवला होता त्याची दखल मंत्री यांचे सचिव यांनी घेतली व ताबडतोब यंत्रणा कामाला लागली व अंध वृद्ध दांपत्याला बेड उपलब्ध झाला असे म्हटले जात असून त्यांना उपचार नाकारणाऱ्या खाजगी हॉस्पिटल वर कारवाई मनपा करणार का असा सवाल ठाणेकर करीत आहेत.