*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*

 मुंबई -: : महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन आज पहिली रेल्वे रवाना केली. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवून रवाना केले.


या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या पाच दिवसात एकशे दहा मे. टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळे पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असे केंद्र शासनाला सुचवले होते. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली असून यापुढील काळात प्राणवायूच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.


मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्याचा परिवहन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या आठ दिवसांपासून केंद्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे यासंदर्भात पाठपुरावा करत होते. ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकरचे आकारमान, उंची याअनुषंगाने विद्युतीकरण झालेल्या रेल्वेमार्गावरुन वाहतूक करण्याबाबत काही अडचणी, आव्हाने होती. तथापि, योग्य आकारमानाचे टँकरचा शोध घेऊन कळंबोली येथील प्लॅटफॉर्म काही अंशी अपूर्ण असल्याने बोईसर येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन रेल्वेच्या सपाट वॅगनवर रिकामे टँकर लोड करुन यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. 


कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे अधिक व्यवहार्य असल्याने दोन दिवसात येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले; आणि आज प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सायं. ७ वा. च्या दरम्यान ऑक्सिजन एक्स्प्रेसला रवानाही करण्यात आले. हे प्रत्येकी १६ मे. टन. द्रवरुप ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर आहेत. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, ताईयो निप्पॉन सॅन्सो इं., एअर लिक्विड, लिंडे आदी कंपन्यांचे हे टँकर आहेत. नेहमीच्या पुणे-सिकंदराबाद- विजयवाडा रेल्वेमार्गा वर पुणे दरम्यान बोगदे असल्यामुळे ओव्हरहेड वायरची उंची तुलनेत कमी होत असल्याने या मार्गावरुन ऑक्सिजनचे टँकर वाहून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तुलनेत लांबचा असला तरी व्यवहार्य असा सूरत- नंदूरबार- जळगाव- नागपूर असा लोहमार्ग निवडण्यात आला आहे.


 दरम्यान “या एक्स्प्रेसला सिग्नल्सचा कमीत कमी अडथळा येईल अशा पद्धतीने ‘ग्रीन कॉरिडॉर’ही तयार करण्यात आला असून केवळ दीड दिवसात ती विशाखापट्टणम येथे पोहोचेल. तेथील ‘राष्ट्रीय इस्पात लि.’ या कंपनीतून दीड-दोन दिवसात द्रवरुप प्राणवायु भरुन टँकर लगेच पुन: महाराष्ट्राकडे रवाना होतील. अशा पद्धतीने येत्या पाच दिवसाच्या आत सुमारे ११० मे. टन  ऑक्सिजन  राज्याला रेल्वेवाहतुकीद्वारे राज्याला प्राप्त होईल. उच्च वजनक्षमतेमुळे ऑक्सिजन टँकरची वाहतूक रस्तामार्गे करणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नव्हते तसेच त्यासाठी प्रदीर्घ वेळ लागला असता.” अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.






Popular posts
ठाणे नौपाडा येथील मुख्य भाजी मार्केटचे तलावपाळीला विकेंद्रीकरण. गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय; प्रत्येक भाजीविक्रेत्यांची अँटीजेन चाचणी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
ठाणे :- आज रात्री ८.०० वाजल्यापासून निर्बंधांची नवीन नियमावली शासनाकडून जाहीर.
Image