नाशिक :- नमस्कार
मी सचिन पाटील पोलीस अधीक्षक नाशिक.
खरे म्हणजे आज माझ्या ग्रामीण जनतेला नम्र आवाहन करण्यासाठी आपल्याशी बोलत आहे.
वाढते कोरोना संक्रमण, लॉकडाऊन,कायदा सुव्यवस्था,गावागावात होणारी प्रचंड गर्दी व त्यातून वाढणारा बधितांचा आकडा हा चिंतेचा विषय ठरू पाहत असताना त्याला आटोक्यात आणण्यासाठी आपली सर्वांची साथ लागणार आहे हे मात्र आज स्पष्ट करू इच्छितो.गेल्या महिन्याभराच्या अभ्यास केला तर दररोज आकडे वाढतच चालले आहेत.यात आरोग्य यंत्रणा त्यांचे काम करतंय. स्थानिक प्रशासन त्याची निगा राखताय तर आपले पोलीस त्याला नियमांची चौकट आखून देतायेत.
पोलीस समोर दिसले की मास्क तोंडाला लावायचा हे का घडतंय? पोलिसांना बळाचा वापर का करावा लागतो याचे उत्तर आपण तपासले तर ते आपणा सर्वांच्या आरोग्य सुदृढते साठीच आहे हे सर्वार्थाने सिद्ध होतं. खरे तर अनेकांच्या परिवारातील कर्ते कोविडमुळे साथ सोडून गेले याचे शल्य आहेच.परंतु आपण काळजी कधी घेणार हे सर्वप्रथम मी आपणास विचारु इच्छितो ?
आज घडीला मास्क हेच प्रथमिक कवच बनले आहे.ती खिशात घालून फिरण्याची वस्तू आहे का?असे लहान प्रश्न मनात असताना त्याचे उत्तर सर्वानाच माहीत आहे.मग हा हलगर्जीपणा का होतोय हा मूळ मुद्दा आहे.का म्हणून पोलीस कार्यवाहीची वाट बघावी आज पावेतो अनेक आमच्या पोलीस बांधवांना,भगिनींना कोरोनाची लागण झाली त्यातील अनेकांनी हे जग सोडलं.परंतु नागरिकांना सतर्कतेच्या कमानीत ठेवण्याचे काम आजही 24 तास अविरत सुरू आहे.आणि ते कर्तव्य आम्ही एकसंघपणे करतच राहू.परंतु यात आपल्या सर्वांचीच साथ लागणार आहे.आज वाढणारी भीषण परिस्थिती बघितली तर कोरोनाची दुसरी लाट गंभीर असली तरी.पोलीस प्रशासन खंबीर आहे.कोरोनाचे समूळ उच्चटन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र होऊ यात आणि नियमांच काटेकोर पालन करूया.
कोरोनाचे नियम पाळा व कार्यवाही टाळा.
आपणास घालून दिलेल्या नियमांचे आपण तंतोतंत करावे इतकी विनंती करून माझ्या शब्दांना विराम देतो.
नमस्कार.
आपला
सचिन पाटील (भा.पो. से.)
पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रा.)