ठाणे :– ऊन असो, पाऊस असो, थंडी असो.. वर्षाचे १२ महिने आणि ३६५ दिवस रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी वाहतूक पोलिस विभागाने आकर्षक चौकी आणि छत्री उपलब्ध करून दिल्या आहेत. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या संकल्पनेतून, वाहतूक पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने आयडीएटिक कंपनीच्या वतीने या चौकी आणि छत्री उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पहिल्या टप्प्प्यात कॅडबरी जंक्शन, जांभळी नाका येथील टॉवर नाका, कळवा पूल येथे वाहतूक चौकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर खोपट सिग्नल, कापूरबावडी सिग्नल आणि गांवदेवी येथे वाहतूक पोलिसांसाठी छत्री उभारण्यात आलेली आहे. अत्यंत आकर्षक आणि आटोपशीर अशा या चौकी आणि छत्र्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वाहतूक पोलिसांना यापूर्वी देखील अशाप्रकारे काही ठिकाणी छत्री उपलब्ध करून देण्यात आली होती. पण मध्यंतरी रस्ता रुंदीकरण आदी कामांच्या वेळी या छत्र्या बाजूला पडून राहिल्याने निकामी झालेल्या आहेत. अशावेळी पोलिसांना मात्र भर उन्हात वाहतूकीचे नियंत्रण करावे लागते आहे. त्याची दखल घेऊन आयडीएटिक कंपनीने या छत्र्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांना त्यांचे नियमित कामकाज करण्यासाठी वाहतुकीचे कर्तव्य बजावित असलेल्या ठिकाणीच कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्यासाठी वाहतूक चौकीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच शहरात आणखी काही महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी अशा चौक्या आणि छत्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.