औरंगाबाद :- शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचे नियम सर्वांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्यात. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ रद्द केला आहे. कोरोनाबाबत सुसंगत निर्णय घेऊन सर्वांनी वागावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ‘प्रसार माध्यमान शी बोलताना व्यक्त केली.जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची मुलगी पायल यांचा विवाह सोहळा औरंगाबाद शहरातील एका पंचतारांकित हॉटलेमध्ये २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याच दिवशी लग्नानंतर तेथेच स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याकरिता अनेकांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, जिल्हा आणि शहरात कोरोनाचे संकट पुन्हा डोके वर काढत आहे. त्या अनुषंगाने महानगर पालिका आणि जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम कडक पाळण्याचे आवाहन केले आहे. शिवाय नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. मंगल कार्यालय वा इतर ठिकाणी आयोजित लग्न सोहळ्याला राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे केवळ ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.या सर्व घडामोडींवर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी मुलीच्या लग्नाला केवळ मोजक्याच नातेवाईकांना आमंत्रण दिले आहे. शिवाय त्याच दिवशी होणारा स्वागत समारंभही रद्द केला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शिवाय नियमांचे पालन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याकरिता आपण स्वत:हून स्वागत समारंभ रद्द केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ‘या विवाहासाठी आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाची नितांत आवश्यकता आहे. आपण फक्त शुभेच्छांच्या माध्यमातून वधुवरास शुभ आशीर्वाद द्यावेत’ अशी विनंतीही त्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय पाहून इतरही नागरिक याचे अनुकरण करतील अशी अपेक्षा यानिमित्त व्यक्त होत आहे.
लेकीला लग्नाच्या घरातूनच शुभेच्छा द्या’,सुनील चव्हाण जिल्हाधिकारी यांच्या कडून स्वागत समारंभ रद्द,