ठाणे – वाहतूक पोलिस हे मुख्यतः वाहतुकीच्या नियमनासाठी, रस्त्यावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी असतात, असा एक समज असतो. रस्त्यावर अपघात होऊ नयेत, वाहतूक सुरळीत राहावी, हे पाहाणे तर वाहतूक पोलिसांचे काम आहेच; पण त्याचबरोबर पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांना निर्वेध, सुरक्षित पद्धतीने रस्त्यांवरून चालता यावे, हे पाहाणे देखील वाहतूक पोलिसांचीच जबाबदारी आहे. ही बाब अधोरेखित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरही विशेष भर दिला आहे.
सध्या रस्त्यांवर वाहनांची इतकी गर्दी असते की, वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यातच कुठे गॅसची पाइपलाइन टाक, कुठे पाण्याची पाइपलाइन टाक, कुठे ड्रेनेज ची कामे तर कुठे दळनवळनासाठी केबल चे काम अशा विविध कामांसाठी रस्ते खणलेले असतात. मेट्रोसारख्या प्रकल्पांची व स्मार्ट सिटीची कामेही ठाण्यात सुरू असल्याने रस्त्यांची रुंदी अर्धी झाली आहे. उरलेल्या जागेत वाट्टेल तशा उभ्या राहाणाऱ्या रिक्षा, फेरीवाले, अरुंद, अतिक्रमित वा उखडलेले फुटपाथ, अशा विविध कारणांमुळे या रस्त्यांवरून पादचाऱ्यांना निर्वेधपणे चालणे ही दुर्मीळ बाब झाली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला असून ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले, दिव्यांग व अंध व्यक्ती यांना निर्धोकपणे रस्त्यावरून चालणे शक्य व्हावे, रस्ता ओलांडताना त्यांना कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस मदत करत आहेत.
सध्या देशभरात रस्ते सुरक्षा मोहीम सुरू असून ठाण्यातही वाहतूक पोलिस विभागाच्या माध्यमातून ती राबवली जात आहे. याअंतर्गत रस्ते सुरक्षेसंदर्भात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा रोख सुरक्षित वाहतुकीवर आणि सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे, याबाबत जनजागृती करण्यावर असला तरी पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे, असे उपायुक्त (वाहतूक) बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. रस्त्यांवर पहिला अधिकार हा पादचाऱ्यांचा असून नेमके याच बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. अपघातात अनेकदा पादचाऱ्यांचा हकनाक बळी जातो. अशा अपघातांमध्ये अनेकदा त्यांचा काहीही दोष नसतो. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष देण्याची गरजच नाही, तर ते आपले कर्तव्य आहे. यामुळेच पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीही सध्याच्या रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत विशेष उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहितीही श्री. पाटील यांनी दिली. याअंतर्गत पादचाऱ्यांना रस्त्यांवरून निर्वेधपणे चालता यावे, त्यांना कुठल्याही अडथळ्यांना तोंड द्यावे लागू नये, त्यांना व्यवस्थित रस्ते ओलांडता यावेत, यासाठी प्रयत्न करतानाच ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले व दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक पोलिस स्वतः मदत करण्याचेही पाटील यांनी सांगितले. केवळ सुरक्षा मोहिमेपुरतेच नव्हे, तर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिस सदैव कटिबद्ध आहेत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.