अंबरनाथ : येथील मोहन ज्योत गृहनिर्माण संस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या कामात कुचराई करणारे सहकारी संस्था सहाय्यक निबंधक सुरेश अंधारे आणि प्राधिकृत अधिकारी संगीता घोडके यांच्याविरोधात स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि ठाणे जिल्ह्याचे उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे. आपल्या कर्तव्यात कसूर करणा-या या दोन्ही अधिका-यांची चौकशी केली जावी, अशी मागणी डॉ. किणीकर यांनी पत्रात केली आहे. तसेच वरील दोन्ही अधिका-यांविरोधात लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात प्राधिकृत अधिकाऱ्यास कर्तव्यात कसुर केल्याबद्दल परत बोलावण्यात येईल सोसायटीच्या पाच सदस्यांची एक समिती तात्काळ गठीत करण्यात येईल असे आश्वासन जिल्ह्य उपनिबंधक यांनी दिले आहे .
सहाय्यक निबंधक आणि प्राधिकृत अधिकारी यांनी मोहन ज्योत सोसायटीच्या रद्दबातल करण्यात आलेल्या व्यवस्थापन समितीचे किशन दुस्सेजा यांच्याशी संगनमत करून चौकशीत टाळाटाळ करण्याचे तसेच विशेष लेखापरीक्षण करण्यात देखील टाळाटाळ केली आहे.यासंदर्भात सोसायटीच्या सदस्यांनी जून, २०१९ पासून उभय अधिका-यांना तब्बल ७० पत्रे लिहिली परंतु दोषींवर कारवाई करण्यात टाळाटाळ झाली.
या पार्श्वभूमीवर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल या दोन्ही अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोसायटीच्या सदस्यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे केली. त्यानुसार किणीकर यांनी सहकारमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे उपनिबंधक यांच्याकडे उभय अधिका-यांविरोधात तक्रारी दाखल केल्या.
खोटी बिले सादर करून पैसे हडपणे, बँकेतील रक्कम परस्पर काढून घेणे, धनादेशावर खोट्या स्वाक्ष-या करणे, गृहनिर्माण सोसायटीच्या कामकाजासंदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसवून अनिर्बंध कारभार करणे इत्यादी आरोप असलेल्या येथील मोहन ज्योत गृहनिर्माण सोसायटीच्या निलंबित सरचिटणीस आणि व्यवस्थापन समितीविरोधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ८३ अन्वये चौकशी करण्याचे आदेश अंबरनाथ सहकारी संस्था सहाय्यक निबंधकांनी दिले आहेत.
दोन वर्षांचे विशेष लेखा परीक्षण आणि दोषी सदस्यांची सुरू असलेली चौकशी या दोन्हींचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरोधात योग्य ती कारवाई केली जाणार आहे. गैरव्यवहार करून वापरण्यात आलेल्या पैशांची वसुली, केलेल्या प्रत्येक गुन्ह्यासाठी आर्थिक दंड, कारावास यांसह समितीच्या निवडणुकीतून कायमस्वरूपी बाद होणे आणि सोसायटीतून हकालपट्टी इत्यादी प्रकारांचा कारवाईमध्ये समावेश असेल.
विशेष लेखा परीक्षणाबरोबरच सोसायटीचे सरचिटणीस आणि या सर्व गैरव्यवहाराचे सूत्रधार किशन दुसेजा, घनश्याम लुंड, महेश वाधवा, राम गोपलानी आणि इतर यांची अधिनियम ८३ अन्वये चौकशी करण्यात येत आहे. या सगळ्यांनी सलग दोन वर्षे बनावट लेखा परीक्षण तयार करून सोसायटीच्या सदस्यांची फसवणूक केली आहे. ही दोन्ही लेखा परीक्षणे २२ सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या वार्षिक बैठकीत फेटाळून लावण्यात आली आहेत.
स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी या प्रकरणी सहकारमंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जिल्हा उपनिबंधक, ठाणे यांना मोहन ज्योत गृहनिर्माण संस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करून विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले होते.
प्राथमिक चौकशीतील माहितीनुसार सोसायटीच्या इतर सदस्यांच्या हितरक्षणासाठी सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे असून मोहन ज्योत गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची चौकशी करण्याचे आदेश देत असल्याचे सहाय्यक निबंधकांनी स्पष्ट केले.
एखाद्या गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिका-यांची चौकशी होण्याचे अंबरनाथमधील हे पहिलेच प्रकरण आहे.