ठाणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्रामार्फत सावित्री उत्सवाचे आयोजन करून सावित्रीमाईंच्या विचारांचा जागर करण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास) संतोष भोसले यांच्या नेतृत्वाखाली ९ एकात्मिक बाल विकास प्रकल्प आणि १८५४ अंगणवाडी कार्यक्षेत्रात कोविड१९ च्या दृष्टीने खबरदारी घेऊन कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये नुकत्याच जन्मलेल्या मुलींचे स्वागत करून पालकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी अनेक मुलींनी सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा केली होती.अंगणवाडी सेविकांनी मुलांना सावित्रीबाईच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत सेविका, मदतनीस, बचतगट महिलांचा सन्मान करण्यात आला.