उद्या दि.१६/१/२०२१ रोजी लसीकरणास जिल्ह्यात प्रारंभ ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर. •लसीचे 74 हजार डोस प्राप्त •जिल्ह्यात तेवीस ठिकाणी होणार लसीकरण • पहिल्या टप्प्यात 62 हजार 372 लाभार्थ्यांना मिळणार लस.

 


ठाणे -:- बहुप्रतिक्षित कोविड लसीकरणाचा शुभारंभ उद्या दि, 16 जानेवारी  रोजी सकाळी ११ वा  जिल्ह्यातील तेवीस केंद्रावर होणार असून लसीकरणासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.  लसीचे 74 हजार  डोस आरोग्य विभागाला प्राप्त झाले असुन त्यांचे सर्व मनपा व ग्रामीण आरोग्य यंत्रणा यांना वितरण करण्यात आले आहे. कोविड लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या संपूर्ण टिमने कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात अत्यंत शर्थीचे प्रयत्न करुन कोरोना बाधितावर उपचार केले. समाजाचे स्वास्थ सुदृढ ठेवण्यात ज्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी योगदान दिले त्यांच्यापासून लसीकरणाची ही मोहिम सुरु होत आहे. कोविन पोर्टलवर आरोग्य यंत्रणेतील  62 हजार 372 लाभार्थ्यांची नोंदणी  करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण कार्यक्षेत्रातील 9 हजार 659 व मनपा क्षेत्रातील 52 हजार 713 लाभार्थी आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे.

प्रत्येक लाभार्थ्यांला लसीकरण सत्राबाबत एक संदेश मिळणार आहे. त्यात लसीकरण सत्राचे नियोजित ठिकाण व वेळ असणार आहे. लाभार्थ्यांना ही लस स्नायूमध्ये देण्यात येणार  आहे.पहिल्या डोसनंतर सुमारे २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे.  लसीचे दोन डोस घेतल्यानंतर पुढच्या 14 दिवसानंतर लस घेणाऱ्यांच्या शरिरात अँटिबॉडी तयार व्हायला सुरुवात  होईल. कोरोनाची लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असणार आहे.

नोंदणी केलेल्या सर्व शासकीय तसेच खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी   केले आहे. तसेच लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी  सहकार्य करण्याचे आवाहनही  श्री नार्वेकर  यांनी केले आहे.

*असे होईल लसीकरण*
पहिल्या कक्षात : कोविन सॉप्टवेअरमध्ये लाभार्थ्यांचे नोंदणी होईल. नोंदणीनंतर संबधित लाभार्थ्याला एक दिवस आदी मोबाईलवर संदेश पाठविला जाईल. त्यात किती वाजता कोणत्या केंद्रावर लसीकरण आहे, याची माहिती असेल. संबंधित व्यक्ती लसीकरणासाठी आल्याची येथे नोंद होईल.

दुसऱ्या कक्षात : संबधित लाभार्थ्याचे तापमान, तसेच ऑक्सिजनची पातळी, तपासली जाईल. त्यानंतर निर्जुतूकीकरण होईल. त्यानंतर लाभार्थ्यांला लसीकरण कक्षात प्रवेश असेल.

तिसऱ्या कक्षात : दोन वैद्यकीय कर्मचारी नोंदणीकृत लाभार्थी तोच आहे का, याचे ओळखपत्र पाहून खात्री करून घेतील. त्यांची नोंद कोविन ऍपमध्ये होईल.

चौथ्या कक्षात : लसीकरण कक्षात लसीकरण प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून संबधित लाभार्थीला लसीबाबत माहिती देऊन समुपदेशन करण्यात येईल. त्यानंतर इंजेक्शनद्वारे लस टोचली जाईल.

पाचव्या कक्षात : लसीकरणानंतर प्रत्येक लाभार्थ्याला अर्धा तास या कक्षात विश्रांती दिली जाईल. तसेच त्या लाभार्थ्याच्या प्रकृतीवर निरीक्षण केले जाईल. काही त्रास झाल्यास उपचारासाठी स्वतंत्र किट येथे उपलब्ध असेल व झालेल्या त्रासांची नोंदही घेतली जाईल. व त्वरीत उपचार केले जातील.

एका व्यक्तीस लस देण्यासाठी अंदाजे सहा मिनिटांचा वेळ आहे. या व्यतिरिक्त अर्धा तास विश्रांती व निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. प्रत्येक लाभार्थीला लसीचे 2 डोस 4 ते 6 आठवडयाच्या अंतराने देण्यात येणार आहेत. लसीकरण पश्चात लसीकरण झाल्याबाबत QR कोड असलेले डिजिटल प्रमाणपत्र मिळणार आहे.

ग्रामीण भागातील लसीकरण मोहिम 16 जानेवारी 2021 रोजी खालील पाच ठिकाणी सुरु होणार आहे.
1. जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे
2. छाया हॉस्पिटल, अंबरनाथ
3. दुबे हॉस्पिटल, बदलापूर
4. उपजिल्हा रुग्णालय, शहापूर
5. मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर-3

Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image