ठाणे :- मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी २५ डिसेंबरपासून कारवाई सुरू केली आहे. पहिल्या चार दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये सुमारे ४१५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरसह ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारून प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे तर, वाहनांतील सहप्रवासीसुद्धा दोषी ठरतात. यंदा त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
कोरोना संक्रमणाचा धोका असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून वाहतूक पोलिस मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करत नव्हते. ब्रेथ एनलाइजरच्या सहाय्याने तपासणी शक्य नसल्याने मद्यपी वाहनचालकांचा बेदरकारपणा वाढू लागला आहे. रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत त्यामुळे वाढ होण्याचा धोका आहे. ५ जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू असल्याने हाँटेल, बार आणि अन्य ठिकाणी रात्री ११ नंतर पार्ट्यांवर बंदी आहे. परंतु, अनेकजण आपापल्या घरांमध्ये किंवा खासगी ठिकाणांवर पार्टी केल्यानंतर नववर्ष स्वागताचा जल्लोष करण्यासाठी बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे होणारे संभाव्य अपघात आणि गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांची मद्यपी वाहनचालकांच्या विरोधातील कारवाई तीव्र करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मोटार वाहन कायदा, १९८८च्या कलम १८५ अन्वये मद्यपी वाहनचालकांना दोन हजार रुपये दंड किंवा सहा महिने कैद अशी शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा पुन्हा-पुन्हा केल्यास तीन हजार रुपये दंड आणि दोन वर्षे कारावास अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. तसेच, याच कायद्याच्या कलम १८८ मध्ये मद्य प्राशन केलेल्या व्यक्तीला वाहन चालविण्यास उद्युक्त केल्याचा ठपका ठेवत सहप्रवाशांवरही कारवाई होऊ शकते. त्या कलमाचा आधार यंदा पोलिस घेणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मद्य प्राशन करून वाहन चालवू नये किंवा मद्यपी वाहनचालकासोबत प्रवास करू नये, असे आवाहन उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. रात्री ११ नंतर घराबाहेर पडल्यास संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. नववर्षात अशी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी रात्री कुणीही घराबाहेर पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
…तर कुटुंबियांना फोन
पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये मद्यपी वाहनचालक आढळले तर त्यांच्या घरी फोन करून कुटुंबियांना कारवाईबाबतची माहिती देण्याचा विचार वाहतूक पोलिस करत आहेत. तरुण वाहनचालकांच्या विरोधात अशी कारवाई प्राधान्याने केली जाईल. प्रसंगी कुटुंबियांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्याबाबतचा विचारही सुरू आहे.
बारमालकांनी खबरदारी घ्यावी.
मद्यपी वाहनचालकांना रोखण्यासाठी हाँटेल आणि बारमालकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना वाहतूक पोलिसांतर्फे दिल्या जाणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मद्य पिण्याचा परवाना नसलेल्या ग्राहकांना मद्य पुरवू नये. दारू न पिणारा ड्रायव्हर आहे, याची खारतजमा करूनच वाहन मालक आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांना मद्य द्यावे. ग्राहक दारू प्यायला असेल, तर त्याला वाहन चालवण्यास प्रतिबंध करावा. वेळप्रसंगी त्यांना रिक्षा-टॅक्सी आदी वाहनांची व्यवस्था करून द्यावी. शक्य असल्यास त्यांच्या गाडीसाठी पर्यायी ड्रायव्हर उपलब्ध करून द्यावा, असे त्यांना सांगितले जाणार आहे.