ठाणे :- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात ई चलान पद्धतीने कारवाई केल्यानंतर अनेक वाहनचालक दंडाची रक्कम भरणे टाळतात. दंड चुकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या या वाहनचालकांवर ठाणे वाहतूक पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई सुरू आहे. दररोज सरासरी १० लाख रुपये याप्रमाणे गेल्या १३ दिवसांत १ कोटी ३१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई आता आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत कारवाई होण्यापूर्वीच संबंधित वाहन चालकांनी आपापल्या दंडाची थकीत रक्कम भरावी असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
फेब्रुवारी, २०१९ पासून ठाणे वाहतूक पोलीस आपल्या १८ वाहतूक उपविभागामार्फत ई चलान प्रक्रिया राबवत आहेत. १४ फेब्रुवारी, २०१९ ते ३१ डिसेंबर, २०१९ या कालावधीत निमय मोडल्याची ६,३०,२०४ प्रकरणे दाखल झाली होती. त्यांची दंडाची रक्कम २१ कोटी १४ लाख रुपये आहे. तर, जानेवारी, ते १३ डिसेंबर, २०२० या कालावधीत ४ लाख २३ हजार प्रकरणांमध्ये २५ कोटी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोरोना संक्रमाणाच्या काळात या दंडाची वसूली करणे अवघड झाले होते. त्यामुळे दंड वसूलीचे प्रमाणही रोडावले आहे. वाहतूकीचा नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि त्यांचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे थकीत ई चलानच्या दंड वसुलीसाठी ठोस मोहिम राबविण्याचे आदेश त्यांनी वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना दिले आहेत. त्यानुसार वाहनचालकांना २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दंड भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर १ डिसेंबरपासून या थकबाकीदारांच्या विरोधात कारवाई सुरू झाली आहे. दररोज सरासरी १० लाख रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. या मोहिमेअंतर्गत होणारी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी स्वतः थकीत दंडाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे. आपल्या वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली आहे. ती भऱण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहनचालकांनी त्याचा अवलंब करावा असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
अशा पद्धतीने भरा ई चलानचा दंड
१. ठाणे शहर वाहतूक विभागाच्या अधिपत्याखाली ५९ अधिकारी आणि अंमलदारांकडे ई चलान मशिन आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही चलानची रक्कम रोख किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून तिथे भरता येते.
२. www.mahatraffic,gov.in या शासनाच्या वेबसाटवर आपल्या वाहनाचा किंवा चलान क्रमांक नोंदविल्यास प्रलंबित तडजोड शुक्ल दिसून येईल. तिथे चलान क्रमांकाची निवड करून दंडाची रक्कम भरता येते.
३. पेटीएम अँप मध्ये रिचार्ज आणि बिल पेमेंट या पर्यायांवर क्लिक केल्यानंतर चलान नावाचा टँब दिसतो. तिथे पुन्हा क्लिक केल्यानंतर Traffic Authority अशी विचारणा केली जाते. त्यावर महाराष्ट्र ट्राफिक पोलीस हा पर्याय निवडावा. त्यानंतर वाहन किंवा चलान क्रमांक नोंदवून दंडाची रक्कम भरता येते.
४. Mahatriffic App,Mum traffic App मध्ये My Vehicle या टँबवर क्लिक करून आपल्या गाडीचे रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर My E challan मध्ये आपल्या गाडीवर किती तडजोड रक्कम बरायची आबे ते दिसेल. त्यानंतर चलानवर क्लिक करून त्या रकमेचा भरणा करता येईल.