मुंबई : कोरोनोच्या वैश्विक महामारीपासून बचावासाठी माणसं कमीत कमी एकमेकांच्या संपर्कात यावीत म्हणून आवश्यक तेवढं शारिरीक अंतर ठेवणं हे अत्यंत गरजेचे आहे. परंतु याला सोशल डिस्टन्सिंग म्हणणं कितपत योग्य आहे? मात्र भारतात सोशल डिस्टन्सिंग हा शब्द नवा नाहीये. इथल्या एका विशिष्ट जात समूहाविरूद्ध कित्येक वर्ष सोशल डिस्टन्सिंगच पाळलं गेलं. मात्र डॉ. आंबेडकरांनी खूप कष्ट करून इथलं सोशल डिस्टन्सिंग मोडित काढलं. सध्याच्या कोरोनाविरोधातल्या लढाईत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. WHO ने ही सोशल डिस्टन्सिंग हा शब्द वापरणं बंद केलंय. त्यामुळे भारतातही सोशल डिस्टन्सिंग हा शब्द वापरू नये, अशा आशयाचं पत्र समाजशास्त्रज्ञ गणेश देवी आणि लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.
जातीप्रथेच्या नावाखाली अस्पृश्यता पाळणं म्हणजे एका समूहापासून सोशल डिस्टन्सिंग पाळणंच होतं. हेच सोशल डिस्टन्सिंग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपुष्टात आणलं. म्हणून सोशल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग आपण नाकारण्याची आवश्यकता आहे, असं गणेश देवी आणि कपिल पाटील यांनी पत्रात लिहिलं आहे.
सोशल डिस्टन्सिंगची नाही तर सोशल कनेक्टची या काळात सर्वाधिक गरज असते. सोशल डिस्टन्सिंगपेक्षा “फिजिकल डिस्टन्सिंग” हा शब्दप्रयोग यासाठी अधिक पर्यायी शब्ध होता. मात्र आंबेडकर जयंतीदिवशी पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित करताना सोशल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग केला. तसंच मीडिया देखील सऱ्हासपणे हाच शब्दप्रयोग वापरत आहे. त्यामुळे हा शब्दप्रयोग आता थांबवणं गरजेचं आहे. पंतप्रधानांनीही इथून पुढे हा शब्दप्रयोग करू नये, अशी विनंती या पत्रातून केली गेली आहे.
फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून किंवा संशयित रूग्णापासून ठराविक अंतर ठेवणं. यासाठी खरं तर कोरोना डिस्टन्सिंग करणं हा शब्द अतिशय योग्य राहिला असता. जाती प्रथेची उतरंड आणि उच्च-निचतेची प्रथा याच सोशल डिस्टन्सिंगवर आधारली गेली आहे. त्यामुळे मीडियाने देखील हा शब्दप्रयोग थांबवावा, असं आवाहन देखील या पत्राच्या माध्यमातून गणेश देवी आणि कपिल पाटील यांनी केलं आहे.