मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनचा कालावधी दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आला आहे. देशात विविध ठिकाणी अडकलेले मजूर व कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली आहे तरी रेड झोन असलेल्या मुंबई-पुणे सारख्या शहरांमधून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी अथवा येण्यासाठी बंदी कायम ठेवली आहे.
दरम्यान, या दोन आठवड्यामध्ये रुग्णसंख्येवर विभागणी केलेल्या विविध झोननुसार कोण कोणत्या गोष्टींना परवानगी दिली जाणार आहे? याबाबत सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यानुसार परवानगी दिलेल्या विविध सुविधांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
*ग्रीन झोन* मधील व्यवहार –
-ग्रीन झोनमध्ये सर्व व्यवहार सुरू राहतील. मात्र ज्या गोष्टींमुळे गर्दी होईल असे, सिनेमागृह, शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था,रेल्वे सेवा,सामाजिक, राजकीय, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवता येणार नाहीत
-अधिकृत पास असल्याशिवाय ग्रीन झोनमध्ये प्रवास करण्यास मनाई असेल
-प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के व्यक्तींना घेऊन बस सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. बस डेपोमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित इतकीच असावी.
-बस सेवेला फक्त ग्रीन झोनच्या आतच फिरण्यास परवानगी असेल
-राज्य सरकारने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना किंवा आदेश काढून ज्या गोष्टींना परवानगी दिली आहे. त्या विशिष्ट अटींच्या अधीन राहून सुरू ठेवता येतील.
*ऑरेंज झोन* मधील व्यवहार : (कंटेनमेंट झोन बाहेर)
– जिल्ह्यातल्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही बस सेवा सुरू ठेवता येणार नाही
-केश कर्तनालय, स्पा आणि सलून सुरू राहतील
– सरकारी कार्यालय, बँक, पोस्ट ऑफिस व इतर आवश्यक दुकाने सुरू राहतील
-काही अटींच्या अधीन राहून खालील बाबींना परवानगी देण्यात येईल,
एक वाहनचालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब यांना परवानगी देण्यात येईल.आवश्यक ती परवानगी घेऊन जिल्ह्यातल्या जिल्ह्यात व्यक्ती आणि वाहनांना फिरण्यास परवानगी असेल. मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किंवा त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधींकडून पासेस घेणे आवश्यक राहील.
चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालकाशिवाय केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करण्याची मुभा असेल
*रेड झोन* (हॉटस्पॉट्स)मधील उपक्रम – (कंटेनमेंट झोन) बाहेरील) पुढील उपक्रमांना/कृतींना परवानगी दिली जाणार नाही :
– सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा
– टॅक्सी आणि कॅब एकत्रित करणारे
– जिल्ह्यार्तंगत व आंतरजिल्हा बस चालविणे
– केशकर्तनालय, स्पा आणि सलून
– रेड झोनमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या किराणामाल वैद्यकीय दवाखाने आणि औषधालये उघडी राहतील.
शहरी भागातील औद्योगिक आस्थापना/संस्थाः
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), मालेगाव महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका वगळता इतर क्षेत्रातील केवळ विशेष आर्थिक क्षेत्रे (एसईझेड), निर्यातभिमुख युनिट (ईओयूएस), औद्योगिक वसाहती आणि औद्योगिक वसाहतीमधील औषधे, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे, त्यांचा कच्चा माल आणि मध्यस्थी यासह आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांचे युनिट्स; उत्पादन युनिट, सातत्याने प्रक्रिया आवश्यक असणारे युनिट व त्यांची पुरवठा साखळी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला लागणारे (आयटी) हार्डवेअरचे उत्पादन आणि पॅकेजिंग मटेरियलच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटस परवानगी आहे. मात्र, त्यासाठी सामाजिक अंतर व योग्य शिफ्टची काळजी घेणे आवश्यक आहे.
– बँकेचे व्यवहार तसेच पोस्टाचे कार्यालय चालू राहतील.
ग्रीन झोन, ऑरेंज झोन तसेच रेड झोन मध्ये दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारची वाईन शॉप किंवा इतर दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.