नवी दिल्ली – कोरोना हॉटस्पॉट, प्रतिबंधित क्षेत्र, नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील बाजारपेठा व व्यापारी संकुले (मॉल्स) वगळून सर्व प्रकारची दुकाने आज (शनिवार) पासून सुरू करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याची तसेच दुकानात ५० टक्के कामगारांवरच काम करण्याची अट या दुकानदारांना बंधनकारक राहणार आहे.
देशातील हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य भागांमध्ये २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला. त्यानुसार काही उद्योग सुरू करण्यास सशर्त मान्यता देण्यात आली होती. त्या पाठोपाठ लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने हा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशभरात काही अटींवर सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास केंद्राने परवानगी दिली असून लाखो दुकानदारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा या संदर्भातील आदेश काढला. त्यानुसार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी म्हणजेच आज सकाळपासून हा आदेश लागू होणार आहे. महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत. त्याचवेळी शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व मॉल्स तूर्त तरी बंदच राहणार आहेत.
केवळ नोंदणीकृत दुकानांनाच ही परवानगी असणार आहे. दुकानांत एका वेळी ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतील. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचं आहे तसेच मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल अशा काही अटी केंद्र सरकारने दुकानदारांना घातल्या आहेत. मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजानचा महिना सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
पालिका व नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठांमध्ये जी दुकाने आहेत ती उघडण्यास मनाई असेल. ही दुकाने ३ मे पर्यंत उघडता येणार नाहीत. सिंगल ब्रॅण्ड व मल्टिब्रॅण्ड मॉल्स उघडण्यासही परवानगी नसेल. त्याचवेळी पालिका वा नगरपरिषद हद्दीबाहेरील दुकाने मात्र उघडता येणार आहेत, असे गृहसचिव अजय भल्ला यांनी स्पष्ट केले. करोना हॉटस्पॉट तसेच कंटेनमेंट झोनमधील दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागांत दुकाने उघडण्याची मुभा मिळणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.