मुंबई-पुणे प्रवासात सोबती राहिलेल्या 'अमृतांजन पुला', कायम तुझा ऋणी राहील...

 


मुंबई-पुणे प्रवासात सोबती राहिलेल्या 'अमृतांजन पुला', कायम तुझा ऋणी राहील...                                     


लाल एसटीतून ते आरामदायी कारमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हृदयातील प्रवास नावाच्या कप्प्यात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या या ब्रिटीशकालीन अमृतांजन पूलाच्या कमानीला कायम जिव्हाळ्याचं स्थान राहिलेलं आहे.  कालांतराने द्रुतगती महामार्गावर वाहनांची संख्या वाढली,  अमृतांजन पुलाच्या कमानीखालच्या अरुंद रस्त्यावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यामुळे १८३० च्या बोर घाटाच्या मूळ बांधकामातील या पूलाची कमान आता लाॅकडाऊनच्या काळात पाडण्यात येणार आहे, त्याच्याच या काही आठवणी...  मुंबईहून पुण्याला जाताना खंडाळा घाटात 'अमृतांजन पुलाची' कमान आली की, 'हे काय आलंच तासाभरावर पुणं' असं मनाशीच समजावणं असायचं. या पूलाच्या नावातही एक गंमत आहे, पूलाजवळ काही एक वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या अमृतांजन बामच्या नावावरुन या पुलालाही 'अमृतांजन' असं नाव पडलं.   मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना पुलाच्या अलीकडे चढणीवर होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीशी सामना करावा लागे. या कोंडीतून मार्ग काढून हळू हळू पुढे जाताना, समोर उभी ठाकलेली ही अमृतांजन पुलाची अवाढव्य दगडी कमान पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे. तिच्याकडे पाहून कायम असं वाटायचं की,  "समोरच्या घाटातल्या उंच डोंगरांनी कितीही अस्मानी संकट आणूदेत, मी मात्र निडरपणे उभा राहणार" अशीच ती कमान बोलत असेल.  पुढे कमान पार केली आणि बोगदा लागला की, हे कणाकणा पोहचलोच आपण पुण्यात. लहानपणी लालपरीने जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करताना पायथ्याशी खोपोलीजवळ टाटा पावरच्या इथून घाट चढताना खिडकीतून वर डोकावून या 'अमृतांजन पुलाची' कमान पाहण्यात एक वेगळाच आनंद असायचा, माहित नाही का, पण प्रवासात अमृतांजनच्या त्या दगडी कमानीला पाहिल्याशिवाय  मनाला समाधान मिळायचं नाही. पुढे चारचाकीने प्रवास करतानाही ही परंपरा कायम राहिली. या पुलाच्या कमानीखाली गाडी आल्यानंतरचा सुखद गारवा माझ्यासह अनेकांनी अनुभवला असेल. कोणी फोन करून विचारलं, "कुठे पोहचलास" तर उत्तर ठरलेलं असायचं "घाटात आहे" मग या उत्तरावर समोरच्याचा प्रश्न असायचा " अमृतांजन क्रॉस केलंस का" आणि मिळणाऱ्या उत्तरावरून समोरचा आपल्या येण्याच्या वेळेचा चोख अंदाज बांधायचा. काही प्रवाशांची तर कमान येईपर्यंत एक झोप होत असे. अनेकदा मुंबई-पुणे असा इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन, सिंहगड आणि प्रगती या दख्खनच्या राण्याही प्रवास करताना या अमृतांजनचं दर्शन घडवतात...


आता पुढील काही दिवसात वाहतूक कोंडीस कारण ठरणाऱ्या या पूलाची ही अवाढव्य, विस्तीर्ण दगडी कमान पाडण्यात येईल. इथली वाहतूक कोंडीही दूर होऊन गाड्या भराभरा पुढे जातील. मात्र इथून जाताना आता पूल नसेल, त्याला पाहण्यातला आनंद नसेल. मात्र अमृतांजन पूला, इथून जाताना तू नसलास तरी तुला न पाहिलेल्या पिढीला तुझ्या अवाढव्य पणाच्या गोष्टी सांगू, तुला पाहण्यातला आनंद सांगू... 


"अमृतांजन पूला, मुंबई पुणे प्रवासात कायम सुखद गारवा आणि तुला पाहण्यातला आनंद देण्यासोबत मन खंबीर करणाऱ्या तुझे, कायम आम्ही ऋणी राहू" 


तुझ्यावर प्रेम करणारा एक प्रवासी 
- ऋषिकेश मुळे 



Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image