ठाणे :- कोव्हीड बाधीत रूग्णांच्या संपर्कातील अति जोखीम गटातील व्यक्तींची माहिती आणि घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच प्रभाग समितीमधील जे दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत त्यांची दुकाने सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व परिमंडळ उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना दिले.
कोव्हीडचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी श्री. सिंघल यांनी आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीमध्ये त्यांनी बाधित व्यक्तींच्या संपर्कातील अति जोखीम गटातील व्यक्तींची माहिती आणि ज्या ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केले आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. याबाबत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले,
नागरिकांच्या व्यापक हिताचा विचार करून प्रत्येक प्रभाग समितीमध्ये स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व कारवाई सर्व सहाय्यक आयुक्तांनी करावी असे सांगतानाच जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करा असे श्री. सिंघल यांनी सांगितले.
भायंदरपाडा येथील विलगीकरण कक्षामध्ये ज्या व्यक्तींचे चाचणीचे अहवाल अप्राप्त आहेत तसेच ज्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवायचे आहेत त्या व्यक्तींनाच केवळ भायंदरपाडा विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे. जर त्यांचे अहवाल पॅाझिटीव्ह असतील तर त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये तर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना घरगुती विलगीकरण करण्यास किंवा महापालिकेच्या कासारवडवली येथील विलगीकरण कक्षात पाठवावे अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान बाधीत रूग्णांच्या संख्येनुसार प्रभाग समितीनिहाय रेड झोन आणि ॲारेंज झोन निश्चित करून त्याची माहिती तात्काळ मुख्यालयास कळवावी. तसेच प्रभाग समितीमध्ये हॅाटस्पॅाट असल्यास त्या अनुषंगाने नियोजन करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही श्री. सिंघल यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त(1) राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, कोव्हीड-19 विशेष कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.