ठाणे - ठाणे शहरात भव्य असे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन' उभे रहावे यासाठी गेले काही वर्षे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे प्रयत्न व पाठपुरावा करीत होते. ठाण्यात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवना'च्या कामाला अंतिम मंजुरी देण्याचे आदेश या खात्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. या भवनाच्या कामाला अंतिम मंजुरी देण्यात येत असून फेब्रुवारी महिन्यात भवन बांधण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया झाली पाहिजे, असे आदेश मंत्र्यांनी दिले . गेले अनेक वर्षे ज्या कामासाठी पाठपुरावा सुरु होता ते भवनाचे काम मार्गी लागले आहे, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी पत्रकारांना दिली. ठाण्यात तीन मजली भव्य असे भवन उभे राहण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. ठाणे महापालिका हद्दीत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन' उभे राहावे म्हणून आमदार सरनाईक अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहेत. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात कासारवडवली येथे आनंद नगर नाक्याजवळील टकारडा पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास ११२५ स्केवर मीटरचा भूखंड असून या भूखंडावर हे भवन बांधले जाणार आहे. येथील आरक्षित भूखंडावर हे भवन व्हावे म्हणून आमदार | सरनाईक यांनी दिलेला प्रस्ताव ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही मंजूर केला त्यानंतर ठाणे महापालिकेच्या महासभेनेही याबाबत ठराव मंजूर केला होता. पालिकेने ठराव मंजूर करून पुढील खर्चाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी मिळावी म्हणून राज्यसरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. या भवनासाठी ९० टक्के खर्च राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग करणार आहे , तर १० टक्के निधी पालिका खर्च करणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला मंजुरी