मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयानेही सहमती दर्शविली आहे. पेड न्यूजमध्ये आणि निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती देण्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रस्तावही आयोगाने मंगळवारी दिला. कायदा मंत्रालय निवडणूक प्रक्रिया बदलण्यास तयार आहे. यामुळे देशाच्या कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे.प्राप्त माहितीनुसार, आयोगाने निवडणूक सुधारणांसह पेड न्यूज आणि चुकीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या मुद्यांवर कायदा मंत्रालयासोबत बैठक घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोड़ा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्र यांनीही कायदा मंत्रालयाचे सचिव जी नारायण राजू यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडण्यासंदर्भात चर्चा केली.
कायदा मंत्रालयाने निवडणूक आयोगासोबत केलेल्या पत्रव्यवहारामध्ये लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये मतदान ओळखपत्र बनविताना किंवा मतदार यादीत नाव असलेल्या लोकांकडून आधार क्रमांक मागण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, यासाठी निवडणूक आयोगाला मतदारांकडून गोळा होणारी माहिती उच्च स्तरीय सुरक्षेत ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. माहिती चोरी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने गरजेच्या बाबींची माहिती दिली आहे. तसेच नव्या मतदार नोंदणीसाठी वेगवेगळे पर्यायही उपलब्ध केले आहेत.
मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडणार