डोंबिवली : मागील ३० ते ४० वषींच्या काळात मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी परिसरांतील खाडीकिनारी ड्रेझरने बेसुमार रेतीउपसा करून तस्करांनी खाडीकिना?यालगतची खारफुटी, जलचर, जैविक संपदा नष्ट केली. सततच्या रेतीउपशामुळे खाडीकिनारे खोल झाले आहेत. त्यामुळे पर्यटन म्हणून या खाडीकिनाऱ्यांचा उपयोग करता येत नाही. मुंब्रा ते कल्याण खाडी परिसरात खारफुटीचे घनदाट जंगल होते. रेतीउपशामुळे ते नष्ट झाले. निसर्गाचा समतोल राखणारी जैविक संपदा नष्ट झाल्यामुळे कल्याण, डोंबिवली शहरे प्रदूषणामध्ये देशात अव्वल क्रमांकावर असल्याचे सांगितले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून प्रदूषण नियंत्रणासाठी महसूल, वन विभागातर्फे विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरण दक्षता मंडळातर्फे खाडीकिनारी दरवर्षी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने खारफुटी लागवड केली जात आहे. महसूल विभागाने अनेक ठिकाणी खारफुटी लागवड केली आहे. हे निसर्ग संगोपनाचे प्रयत्न सुरू असताना पुन्हा डोंबिवली खाडीत देवीचा पाडा, रेतीबंदर परिसरात अवाढव्य असे रेतीउपशाचे ड्रेझर दिसू लागल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ड्रेझरवर रेतीउपशासाठी एक २० फुटांची शिडी असते. ती शिडी खाडीतून रेती काढण्यासाठी हवेच्या दाबाने गाळात घुसवली जाते. या वेळी खाडीतील मासे, आजूबाजूचे खडक, झाड, त्यांची मुळे यांना खूप धक्के बसतात. शिडीच्या दणक्याने खाडीतील नैसर्गिक प्रवाह बुजले जातात, अशी माहिती रेती क्षेत्रातील एका जुन्याजाणत्या व्यावसायिकाने दिली. हेच ड्रेझर मागील ३० वर्षांहून अधिक काळ खाडीकिनारे उद्ध्वस्त करीत होते. १९९१ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी मधुकर पाटील यांनी रेतीउपशांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामध्ये ड्रेझर ही यंत्रणा पूर्ण नामशेष केली. निसर्गसंपदा संवर्धन करण्यासाठी गेल्या चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, महेंद्र कल्याणकर यांनी संक्शन पंप ही यंत्रणाही नष्ट केली. कल्याण खाडीकिनारीच सुमारे दोन कोटींहून अधिक सामग्रीचे नुकसान झाले आहे. हळूहळू खाडीकिनारे रेती तस्करांच्या तावडीतून सुटून मोकळा श्वास घेत असतानाच पुन्हा ड्रेझरची अजस्र अशी यंत्रे डोंबिवली खाडीत दिसू लागल्याने खाडीकिनारी शतपावलीसाठी जाणाऱ्या नागरिकांनीही भीती व्यक्त केली आहे.
रेती उपशामुळे पर्यावरणाला धोका