ठाणे ठाण्यापुढील प्रवाशांना थेट नवी मुंबईला जाता यावे, यासाठी रेल्वेने हाती घेतलेल्या कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल लिंक प्रकल्पातील बाधितांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीएच्या रेंटल हाउसिंग योजनेतील २१०० घरे या प्रकल्पबाधितांना कायमस्वरुपी देण्याचा निणय नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यामळे या प्रकल्पासमोरील मोठा अडथळा दर झाला आहे. ठाण्यापुढील प्रवाशांना रेल्वेमार्गे नवी मुंबाई ला जायचे असल्यास सद्यस्थितीत ठाण्याला येऊन ट्रान्सहार्बर रेल्वेने जावे लागते. त्यामुळे त्यांना वळसा जातो, नाहक वेळ जातो आणि ठाणे स्थानकात देखील गर्दी होते. हे टाळण्यासाठी कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल लिंक व्हावी, यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. त्यानुसार प्रकल्पाचे काम सुरू झाले. या प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार होते. परंतु, घरे उपलब्ध होत नसल्यामुळे प्रकल्पापुढे अडचण निर्माण झाली होती. एमएमआरडीएने घरे उपलब्ध करून द्यावीत, यासाठी खासदार विचारे व डॉ. शिंदे पाठपुरावा करत होते. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन या प्रकल्पबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी एमएमआरडीएच्या ठाण्यातील रेंटल हाउसिंग योजनेतील २१०० घरे तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. ठाण्यापूढील रेल्वे प्रवाशांसाठी आणि ठाणे स्थानकातील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी एमएमआरडीएने घेतली होती. त्यानुसार, २१०० घरे या प्रकल्पबाधितांसाठी उपलब्ध करून देण्याचा निणय घेतला असून त्याची तातडीने अमलबजावणी करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कळवा- ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन होणार