औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनेची मागणी होती. संभाजीनगर नावाची मागणी मनसे करतेय त्यांनी हा मुद्दा टिकवला पाहिजे. कारण त्यांची धरसोडवृत्ती सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकरच सरप्राईज देतील. मनसे आता बोलायला लागली आहे. आम्ही आधीपासून संभाजीनगर बोलतो. आता अधिकृतपणे मुख्यमंत्री निर्णय घेतील असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. याबाबत एबीपी माझाशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी १९८८ मध्ये मागणी केली होती. अनेकदा आम्ही विरोधात असताना याबाबत पत्रव्यवहार केला होता. यूपीत योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज नाव केलं होतं त्यावेळी लोकसभेतही मी हा प्रश्न विचारला होता. पण त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं नाही. आता ठाकरे सरकार आहे त्यामुळे लवकरात लवकर संभाजीनगर नाव होऊ शकतं. गेल्या २ महिन्यापासून औरंगाबादचं नाव बदलण्याची तयारी सुरु आहे असं त्यांनी सांगितले.
लवकरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर होण्याची शक्यता?