ठाणे :- : ठाण्यात भरदिवसा एका ३५ वर्षीय पुरुषावर कोयत्याने सपासप वार करण्याची धक्कादायक घटना घडली. गजबजलेल्या वसंत विहार या परिसरात भररस्त्यात फिल्मीस्टाईल हा थरार बराच काळ सुरू होता. या प्रकरणी ठाण्यातील चितळसर पोलिसांनी शिवाजी कुरणे या ४८ वर्षीय पुरुषाला अटक केली आहे.
आपल्या पत्नीसोबत शेजारी राहणारा ३५ वर्षीय तरुण भरतसिंग राजपूत याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय शिवाजी कुरणे याला गेल्या अनेक दिवसांपासून होता. याचा राग मनात ठेवून शिवाजी हा भरतसिंग याच्यावर पाळत ठेवून होता. आज सकाळी ११ च्या सुमारास राज पुरोहित कामाला जाण्याकरता घरा बाहेर पडला. वसंत विहारच्या चितळसर परिसरात पोहोचल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या शिवाजी कुरणे याने मागून येऊन भरतसिंगवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेनंतर शिवाजी कुरणे याला चितळसर पोलिसांनी अटक केली असून भरतसिंग याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवाजी कुरणे याची पत्नी भरतसिंग याच्याकडे स्वयंपाक आणि घरकामाकरता जात होती. हे शिवाजी कुरणेला पसंत नव्हते यावरून शिवाजी आणि त्याच्या पत्नीत वाद देखील झाले. यातून भरत सिंग आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय शिवाजीच्या मनात खोलवर रुतला होता. त्यामुळे आरोपी शिवाजीने अनेकदा भरतसिंग याला फोनवरुन धमकी देखील दिल्या होत्या. पण, आज आरोपीने भररस्त्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
जखमी भरतसिंग राजपुरोहित हा एकटाच ठाण्यात राहतो. त्याचे कुटुंबीय मुळगावी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात वास्तव्याला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.