ठाणे - : ठाणे जिल्हा परिषद पदाधिकारी-अधिकारी कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. यावेळी विविध सामाजिक विषयांवरील नृत्य, गायन, नाटिकांचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, उप मुख्य कार्यकारी ( प्रशासन ) डी. वाय.जाधव, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वैशाली चंदे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंठे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत, माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले, कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकारी- कर्मचारी वर्गाने उस्फुर्त सहभाग घेतला. वयैक्तिक तसेच सामुहिक पद्धतीने गायन, नृत्य तसेच नाटिका सादर झाल्या. या कलेच्या माध्यमातून सध्यस्थितीला समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकून जाणीवा जागृत केल्या. विविध पारंपारिक गीतांसह मराठी आणि हिंदी सिनेमातील गीतांचा नजराणा पेश करण्यात आला. पाश्चिमात्य नृत्यासोबत, आदिवासी, लावणी नृत्याचा जलवा देखिल पाहायला मिळाला. पोवाडा, भारुड, पारंपारिक गीत, देशभक्तीपर गीत सादर करण्यात आली. तसेच यावेळी हलक्या-फुलक्या विनोदी एकपात्री आणि लघुनाटीकांमधून विनोदी पेरणी करत उपस्थितांचा ताण हलका करण्यात आला. या शिवाय बेटी बचाव बेटी पढाव, नुकतीच घडलेली हिंगणघाट येथील घटना आदि ज्वलंत विषयावर लघूनाटिकांमधून भाष्य करत सामजिक विषयांवर सादरीकरण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
--